छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात नगरसेवकांच्या नातेवाइकांकडून होणाऱ्या हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी अमोल येडगे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडून आलेल्या अधिकृत नगरसेवक आणि नगरसेविकांनाच प्रशासनाशी संबंधित निर्णय प्रक्रियेत सहभागाचा अधिकार असून, त्यांच्या नातेवाइकांच्या कोणत्याही सूचना अथवा आदेशांची दखल घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश परिपत्रकाद्वारे मंगळवारी (दि. ७) सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

गेल्या काही काळापासून महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालये तसेच विविध विकासकामांच्या ठिकाणी काही नगरसेवकांच्या पती, पत्नी, वडील, मुले आणि भावांचा वाढता वावर असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत होत्या. विशेषतः महिला नगरसेविकांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पती किंवा इतर नातेवाइकांकडून प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप होत असल्याचे प्रकार समोर आले होते. यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अनावश्यक दबाव निर्माण होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती.

परिपत्रकानुसार, काही नातेवाईक स्वतःला नगरसेवक असल्याचा आभास निर्माण करून सामाजिक माध्यमांवर स्वतःचा उल्लेख नगरसेवक म्हणून करतात. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्याच ओळखीने दूरध्वनी करणे, कार्यालयांमध्ये लोकप्रतिनिधी असल्याप्रमाणे वावरणे आणि सूचना देणे, असे प्रकारही घडत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अशा प्रकारांमुळे महापालिकेच्या प्रतिमेला धक्का बसत असून संबंधितांवर कारवाई होऊ शकते, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. हे परिपत्रक सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांनाही पाठविण्यात आले असून, कार्यालयीन शिस्त अबाधित राहण्यासाठी आणि प्रशासनावर अनधिकृत दबाव येऊ नये यासाठी आपल्या नातेवाइकांना या सूचनांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, नगरसेवकांच्या नातेवाइकांनी सामान्य नागरिक म्हणून कार्यालयात येऊन कामे केल्यास त्यांची कामे नियमानुसार आणि प्राधान्याने करण्यात यावीत, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,001 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क