छत्रपती संभाजीनगर : प्रतापनगर परिसरातील दरोड्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध न झाल्याने पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी “एक कॅमेरा शहरासाठी, सर्वांच्या सुरक्षेसाठी” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध खासगी आस्थापनांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच त्यांच्या माध्यमातून किमान ५० मीटरपर्यंतचा परिसर कव्हर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यासंदर्भात ८ जुलै रोजी महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात “एक कॅमेरा शहराच्या सुरक्षेसाठी” ही मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या निदर्शनास आले आहे की, अनेक गुन्हे आस्थापनांच्या बाहेरील परिसरात घडत असले तरी पुरेशा पुराव्याअभावी तपासात अडथळे निर्माण होतात. सध्या अनेक ठिकाणी बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांची गुणवत्ता कमी असून त्यांचे दृश्य क्षेत्र केवळ दुकान किंवा कार्यालयापुरते मर्यादित असल्याने रस्त्यावरील घटना त्यामध्ये स्पष्टपणे कैद होत नाहीत. त्यामुळे आता आस्थापनांच्या बाहेरील रस्ते आणि परिसरही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आणणे आवश्यक करण्यात आले आहे.
नवीन नियमांनुसार सर्व सीसीटीव्ही कॅमेरे २४ तास कार्यरत असणे बंधनकारक राहणार आहे. तसेच किमान १५ दिवसांचे रेकॉर्डिंग जतन करण्याची सुविधा उपलब्ध असावी लागणार आहे. पोलिसांनी मागणी केल्यास संबंधित फुटेज तात्काळ उपलब्ध करून देणे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती देणेही आवश्यक राहणार आहे.
बँका, एटीएम, दागिन्यांची दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार, पेट्रोल पंप, मॉल्स, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, रुग्णालये तसेच निवासी आणि व्यावसायिक संकुले अशा एकूण २३ प्रकारच्या आस्थापनांसाठी हा नियम सक्तीचा करण्यात आला असून शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*