छत्रपती संभाजीनगर : नशेच्या गोळ्यांसाठी दामदुप्पट पैसे मोजावे लागू नयेत, यासाठी एका बारावी उत्तीर्ण तरुणाने चक्क कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून बनावट प्रिस्क्रिप्शन तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानसोपचारतज्ज्ञाच्या जुन्या प्रिस्क्रिप्शनमध्ये AI इरेजरच्या मदतीने रुग्णाचे नाव व तारीख बदलून तो प्रतिबंधित औषधांची खरेदी करत होता. या प्रकरणी छावणी पोलिसांनी रजा सुलतान अब्दुल रहमान शेख (२५, रा. बायजीपुरा, संजयनगर) याला मंगळवारी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पडेगाव येथील मानसोपचारतज्ज्ञांच्या रुग्णालयातील अधिकाऱ्याला शहरातील विविध औषध दुकानदारांचे फोन आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. डॉक्टरांच्या नावाचे प्रिस्क्रिप्शन दाखवून एक तरुण वारंवार प्रतिबंधित औषधे मागत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. त्यानंतर रुग्णालयाने प्रिस्क्रिप्शनच्या प्रती मागवून तपासल्या. डॉक्टरांनी संबंधित प्रिस्क्रिप्शन आपण दिले नसल्याचे स्पष्ट केले. त्यावरील सही व शिक्का बनावट असल्याचेही समोर आले. यानंतर छावणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनाच दाखवला AIचा डेमो
रजाला २०२१ मध्ये मानसोपचारतज्ज्ञांचे जुने प्रिस्क्रिप्शन मिळाले होते. त्याचा आधार घेत त्याने मोबाईलमधील AI मोड व इरेजरच्या मदतीने प्रिस्क्रिप्शनमध्ये फेरफार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने मोबाईलवर बनावट प्रिस्क्रिप्शन तयार करण्याची पद्धत प्रत्यक्ष दाखवली. तो या गोळ्यांचा वापर स्वतःच्या नशेसाठी करत असल्याचे समोर आले असून, त्याने त्यांची विक्री केली होती का, याचा तपास सुरू आहे.
सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा शोध
छावणी ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक विवेक जाधव व उपनिरीक्षक सूर्यकांत शेंबाळे यांनी औषध दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. ओळख लपवण्यासाठी आरोपी हुडी असलेले जॅकेट घालत असल्याचे फुटेजमध्ये दिसले. मात्र, त्याच्या पांढऱ्या चपलांवरून पोलिसांनी ओळख पटवून अंमलदार रवी देशमुख, राजू परचाके, शंकू दांडगे व राजू जाधव यांच्या मदतीने त्याला पकडले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*