छत्रपती संभाजीनगर : शहरात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. घराबाहेर पडताना हेल्मेट न घातल्यास आता थेट १,००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. शहरातील अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर वाहतूक पोलिसांनी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी वाहतूक नियमांचे पालन करून हेल्मेट वापरण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

राज्यातील अपघाती मृत्यूंचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश पोलिस महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस, प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आणि महापालिकेच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीवर भर दिला जात आहे. सुरुवातीला पोलिस कर्मचारी आणि शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात आली. आता सामान्य नागरिकांविरोधातही विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

गुरुवारी शहर वाहतूक पोलिसांनी अवघ्या चार तासांत मोठी कारवाई केली. सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत तब्बल १,१३० विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. प्रत्येकाकडून १,००० रुपये दंड आकारण्यात आल्याने एकूण ११ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. निरीक्षक रेखा लोंढे, मंगेश जगताप, सहायक निरीक्षक रविकांत गच्चे आणि सचिन मिरधे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेल्मेट न घातल्यास दंडासह परवाना निलंबित होण्याची शक्यता

मोटार वाहन सुधारणा कायदा २०१९ मधील कलम १९४ (ड) नुसार विनाहेल्मेट दुचाकी चालविल्यास १,००० रुपयांचा दंड होऊ शकतो. तसेच नियमभंगाच्या प्रकरणात ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाऊ शकते.

अपघाताच्या वेळी हेल्मेट जीव वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यामुळे दंडाची कारवाई टाळण्यासोबतच स्वतःच्या सुरक्षेसाठीही प्रत्येक दुचाकीस्वाराने प्रवास करताना हेल्मेट वापरावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

488 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क