छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सव, विसर्जन मिरवणुका आणि आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. डॉल्बी, प्लाझ्मा आणि प्रेशरमिडसारख्या हाय-डेसिबल साउंड सिस्टम बसविण्यासाठी वाहनांमध्ये अनधिकृत फेरफार करणाऱ्यांविरोधात पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी विशेष प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश १९ सप्टेंबर ते १८ नोव्हेंबरदरम्यान लागू राहणार आहेत.
डीजे सिस्टम बसविण्यासाठी बेकायदेशीरपणे मॉडिफाय केलेली वाहने सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास किंवा भाड्याने दिल्याचे निदर्शनास आल्यास ती जागीच जप्त केली जाणार आहेत. वाहनमालक, चालक तसेच संबंधित मंडळाच्या आयोजकांवरही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याने डीजे चालकांसह वाहन उपलब्ध करून देणारेही पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
मिरवणुकांमध्ये टॉप, मिड, बेस अशा मल्टिस्पीकर सिस्टमसोबत प्लाझ्मा आणि प्रेशरमिडचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या अतितीव्र आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पोलिसांच्या आदेशातील महत्त्वाचे मुद्दे :
– डॉल्बी, प्लाझ्मा व प्रेशरमिडसाठी वाहनांमध्ये फेरफार करण्यास मनाई.
– मॉडिफाइड वाहने मालक, चालक व आयोजकांनी सीलबंद ठेवणे बंधनकारक.
– अशा वाहनांचा सार्वजनिक ठिकाणी वापर किंवा भाड्याने देण्यास मनाई.
– ध्वनिप्रदूषणाच्या निर्धारित मर्यादांचे पालन करणाऱ्या कायदेशीर साउंड सिस्टमला सूट.
– आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ व इतर संबंधित कायद्यांनुसार कारवाई.
नियमांचे पालन करून सण साजरा करणाऱ्यांना कोणतीही अडचण नाही. मात्र, नियमभंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील. मंडळांनी वयोवृद्ध, बालके आणि रुग्णांचा विचार करून ध्वनीची मर्यादा पाळावी, असे आवाहन पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*