छत्रपती संभाजीनगर : कर्णपुरा येथील श्री तुळजाभवानी देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही वाहतूक व्यवस्था ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ते २० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

कर्णपुरा मैदानावर नवरात्रोत्सवाच्या काळात नऊ दिवस यात्रा भरते. या कालावधीत शहरासह परिसरातून मोठ्या संख्येने भाविक श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येतात. यामध्ये महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. भाविकांची गर्दी, वाहनांची वाढती संख्या आणि संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे मार्ग वाहतुकीसाठी बंद

नवरात्रोत्सवाच्या कालावधीत लोहखंडीपूल ते पंचवटी चौक, कोकणवाडी चौक ते पंचवटी चौक, महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) ते पंचवटी चौकाकडे उड्डाणपुलाखालील मार्ग तसेच रेल्वेस्टेशनकडून पंचवटी चौकाकडे पुलाखालून जाणारा मार्ग या मार्गांवरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे.

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

बंद मार्गांऐवजी वाहनधारकांनी अधिसूचनेत नमूद केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा. रेल्वेस्टेशनकडून मध्यवर्ती बसस्थानक, छावणी व पडेजावळीकडे जाणाऱ्या वाहनांनी महावीर चौकाजवळील उड्डाणपुलाचा वापर करावा. तसेच नाशिक, धुळे, जालना, बीड आणि पुणे-अहमदनगर दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी शरणापूर फाटा, साजापूर फाटा, लिंक रोड आणि बीड बायपास यांसारखे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ही अधिसूचना पोलीस, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही. वाहनधारकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

712 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क