छत्रपती संभाजीनगर : पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खरीप पिकांचे नुकसान, पाण्याची कमतरता आणि आर्थिक विवंचना अशा संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचे आंतर-मंत्रालयीन पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले असून, गुरुवारी रात्री झालेल्या प्रशासकीय बैठकीनंतर शुक्रवारी गावपातळीवरील पाहणी सुरू करण्यात आली.
देवळीतील शेतांमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील देवळी गावाला भेट देत केंद्रीय पथकाने आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. केवळ कागदोपत्री माहितीवर अवलंबून न राहता अधिकाऱ्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन पिकांची स्थिती जाणून घेतली. यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा करून पावसाअभावी उद्भवलेल्या अडचणी आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यात आली.
या पाहणी दौऱ्यात मराठवाड्यातील विविध भागांतील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. दौरा आणखी तीन ते चार दिवस चालण्याची शक्यता असून, त्यानंतर नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार करून केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. या अहवालाच्या आधारे मदतीबाबत केंद्र आणि राज्य सरकार पुढील निर्णय घेतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पीक विमा आणि भरपाईचे पैसे कधी मिळणार?
सध्याच्या दुष्काळी संकटासोबतच मागील वर्षीच्या नुकसानभरपाईचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा किंवा नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नसल्याचा मुद्दा पाहणीदरम्यान उपस्थित करण्यात आला. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी बहुतांश प्रलंबित प्रकरणे निकाली काढल्याचे सांगितले. उर्वरित तक्रारी असल्यास त्यांची वैयक्तिक पातळीवर दखल घेऊन सोडवणूक केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
केंद्र सरकारचे पथक आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी संयुक्तपणे परिस्थितीची पाहणी करत आहेत. पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि दुष्काळाची तीव्रता या बाबी अहवालात नमूद केल्या जाणार आहेत. हा अहवाल केंद्र सरकारला सादर झाल्यानंतर मदतीचे स्वरूप स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणीतून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे किती गांभीर्याने मूल्यांकन होते आणि त्यांना दिलासा देण्यासाठी कोणते निर्णय घेतले जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*