छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने शहरातील जुना मोंढा परिसरात मोठी कारवाई केली आहे. जाफर गेट परिसरातील मेसर्स बजरंग ट्रेडिंग कंपनी या खाद्यतेल रिपॅकिंग युनिटवर १२ ऑक्टोबर रोजी छापा टाकून तब्बल २३ लाख ३५ हजार ६५४ रुपये किमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. तपासणीदरम्यान स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.
‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या साठ्यात रिफाइंड सोयाबीन तेल आणि रिफाइंड पामोलीन तेलाचा समावेश आहे. एकूण १२ हजार ३८२ किलो तेल संशयास्पद, अपमिश्रित आणि चुकीचे ब्रँडिंग केलेले असल्याचे कारवाईसंदर्भातील अहवालात नमूद करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील कलम ३८(१)(c) अन्वये हा साठा पुढील आदेशापर्यंत सील करून जप्त करण्यात आला आहे.
तपासणीत स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन
अन्न सुरक्षा अधिकारी कीर्तिका एल. झाडे (झोन-२) यांनी सहकाऱ्यांसह केलेल्या तपासणीत युनिटमधील अनेक त्रुटी समोर आल्या. तपासणीच्या निकषांनुसार २०६ पैकी केवळ १० गुण, म्हणजेच पाच टक्के गुण मिळाल्याचे अहवालात नमूद आहे.
कारखान्याच्या छतावर कचरा साचलेला, स्वच्छतागृह अस्वच्छ आणि फरशीवर तेलाची गळती झालेली आढळली. खाद्यपदार्थ व पॅकेजिंग साहित्याची अयोग्य साठवणूक करण्यात आली होती. माल जमिनीवर थेट ठेवण्यात आला होता. कीटकांना रोखण्यासाठी खिडक्यांना जाळ्या तसेच उंदरांना पकडण्यासाठी आवश्यक सापळे नसल्याचेही तपासणीत आढळले.
कामगारांच्या सुरक्षेसह कागदपत्रांमध्येही त्रुटी
कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नव्हती. तसेच कामगारांकडे डोक्यावरील कॅप, ॲप्रन आणि हातमोजे यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. तेलाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळा किंवा अन्न तंत्रज्ञाची व्यवस्था नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. तेल खरेदीसंबंधी अधिकृत कागदपत्रे सादर करण्यातही त्रुटी आढळल्या.
या प्रकरणी प्रशासनाने संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित केला असून, जप्त केलेल्या साठ्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात खाद्यतेलाची खरेदी करताना ग्राहकांनी पॅकिंग, ब्रँड, उत्पादनाची माहिती आणि गुणवत्ता याबाबत दक्षता घ्यावी, असे या कारवाईतून अधोरेखित होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*