छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातींच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक लूट करण्याचे प्रकार वाढत असताना, छत्रपती संभाजीनगरमध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. डेटिंगच्या आमिषाला बळी पडलेल्या २५ वर्षीय भाजीपाला व्यापाऱ्याला खासगी व्हिडिओच्या आधारे धमकावून पैसे उकळल्याचा आरोप तिघांवर करण्यात आला आहे. या प्रकरणात तरुणीसह दोघांना पोलिसांनी अटक केली असून, तिसऱ्या आरोपीचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.

एका रुपयाच्या जाहिरातीपासून सुरू झाला प्रकार

कैसर कॉलनी परिसरात राहणाऱ्या आणि जाधववाडी येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाला इन्स्टाग्रामवर एका रुपयात एक दिवस डेटिंग करण्याची जाहिरात दिसली. जाहिरातीच्या आमिषाने त्याने संबंधित अॅप डाउनलोड केले. सुरुवातीला एक रुपया आणि त्यानंतर १९९ रुपये सर्व्हिस फी भरल्यानंतर २२ ऑगस्ट रोजी त्याची एका महिलेशी ओळख झाली.

दोघांची भेट मुकुंदवाडी परिसरात झाली. त्यानंतर ते एपीआय कॉर्नर येथील एका लॉजवर गेले. तेथे महिलेने व्यापाऱ्याच्या नकळत मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. या भेटीनंतर काही दिवसांनी हाच व्हिडिओ व्यापाऱ्यासाठी अडचणीचा ठरला.

धमक्यांनंतर एक लाख रुपये दिले

५ सप्टेंबर रोजी आमीन बिलाल शेख याने व्यापाऱ्याला व्हॉट्सअॅपवर लॉजमधील फोटो पाठवले. त्यानंतर व्हिडिओ सार्वजनिक करण्याची भीती दाखवून पैशांची मागणी करण्यात आली. ८ सप्टेंबर रोजी व्यापाऱ्याला व्हिडिओ दाखवून दहा लाख रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. बदनामी टाळण्यासाठी व्यापाऱ्याने एक लाख रुपये दिले.

पुन्हा पैशांची मागणी; पोलिसांत तक्रार

काही दिवसांनी या प्रकरणात आफताब फिल्म या युट्यूब चॅनलचा मालक तकी हसन खान याचीही भूमिका समोर आली. १५ ऑक्टोबर रोजी व्यापाऱ्याच्या काकांना फोन करून त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी करण्यात आली. मजनू हिल गार्डन येथे पाच लाख रुपये मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काकांनी पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगताच आरोपींपैकी एकाने मोबाइल बंद करून तेथून पळ काढल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी आणि आमीन शेख यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे पुढील तपास करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

434 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क