छत्रपती संभाजीनगर : सरकारी यंत्रणेचे नाव घेत नागरिकांना घाबरवून पैसे उकळण्याचे प्रकार वाढत असतानाच, छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर ठगांनी लक्ष्य केले आहे. आधार कार्डचा गैरवापर झाल्याचे आणि बँक खात्यातून संशयास्पद व्यवहार होत असल्याचे सांगत आरोपींनी ६८ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणामुळे सायबर गुन्हेगारांच्या नव्या कार्यपद्धतीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी संबंधित ज्येष्ठ नागरिकाला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने दूरसंचार नियामक प्राधिकरणाशी संबंधित अधिकारी असल्याचे भासवले. त्यांच्या आधार कार्डचा वापर करून नाशिकमधील एका व्यक्तीने मुंबईतील कॅनरा बँकेत खाते उघडल्याचा दावा करण्यात आला. या खात्यातून बेकायदेशीर व्यवहार सुरू असल्याचे सांगून त्यांना कायदेशीर कारवाई आणि अटकेची भीती दाखवण्यात आली.
अचानक आलेल्या या फोनमुळे ज्येष्ठ नागरिक संभ्रमात पडले. त्यानंतर आरोपींनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला आणि वेगवेगळी कारणे सांगून विश्वास संपादन केला. कारवाई टाळण्यासाठी सांगितल्याप्रमाणे सहकार्य करण्यास त्यांना भाग पाडण्यात आले. याच भीतीचा फायदा घेत सायबर ठगांनी त्यांच्या बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारला.
आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
कोणत्याही सरकारी विभागाकडून फोन आल्याचे सांगून अटकेची धमकी देणाऱ्या व्यक्तींवर तातडीने विश्वास ठेवू नका. व्हिडिओ कॉलवरून होणाऱ्या कथित चौकशीला घाबरून पैसे पाठवू नका. संशयास्पद कॉल आल्यास संबंधित विभागाशी अधिकृत माध्यमातून संपर्क साधावा. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*