छत्रपती संभाजीनगर : नातीच्या साखरपुड्यासाठी घराला कुलूप लावून अंबाजोगाई येथे गेलेल्या सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्याच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाट फोडून सुमारे ७ तोळे सोन्या-चांदीचे दागिने आणि कुटुंबीयांचे पासपोर्ट व आधारकार्ड असा महत्त्वाचा ऐवज लंपास केला. ही घटना विश्व भारती कॉलनीत उघडकीस आली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात १८ ऑक्टोबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश सखाराम मोरे (वय ६२, रा. विश्व भारती कॉलनी) हे सार्वजनिक बांधकाम विभागातून (पीडब्ल्यूडी) सेवानिवृत्त झाले आहेत. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ते पत्नीसमवेत घराला कुलूप लावून नातीच्या साखरपुड्यासाठी मुलीच्या सासरी अंबाजोगाई येथे गेले होते.
दरम्यान, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्या घरी काम करणाऱ्या वंदना कुमावत (रा. जयभवानी नगर) या आल्या. त्यावेळी घराचे कुलूप तुटलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने मोरे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. मोरे यांनी त्यांच्या साडूचा मुलगा अतुल पवार यांना घरी जाऊन पाहणी करण्यास सांगितले. पवार यांनी घराची पाहणी केल्यानंतर घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले.
दागिन्यांसह महत्त्वाची कागदपत्रेही चोरीला
घटनेची माहिती मिळताच मोरे अंबाजोगाईहून छत्रपती संभाजीनगरात परतले. घरात पाहणी केली असता, चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून साहित्य अस्ताव्यस्त केल्याचे दिसून आले. चोरट्यांनी कानातले, मिनी गंठण, सोनसाखळ्या, अंगठ्या, नाकातील मोरणी, चांदीचे पैंजण आणि जोडवे असा सुमारे ७ तोळ्यांचा ऐवज चोरून नेला.
याशिवाय प्रकाश मोरे, अक्षरा प्रकाश मोरे आणि ज्योती प्रकाश मोरे यांचे पासपोर्ट तसेच आधारकार्डही चोरट्यांनी लंपास केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*