वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजीतील एकतानगर परिसरात दोन कुटुंबांमधील जुना वाद पुन्हा उफाळून आल्याने त्याचे रूप हिंसक संघर्षात झाले. सोमवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेत वडील आणि मुलाचा मृत्यू झाला असून, कुटुंबातील अन्य दोन तरुण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत पाच संशयितांना ताब्यात घेतले.

बाबासाहेब रामदास कीर्तिकर (४३) आणि त्यांचा मुलगा निहाल (१८) अशी मृतांची नावे आहेत. साहिल (१७) आणि कुणाल (१९) हे त्यांचे कुटुंबीय जखमी झाले आहेत.
देवीच्या ठिकाणी जाताना वादाची ठिणगी
मिळालेल्या माहितीनुसार, कीर्तिकर आणि गायचंद कुटुंबांमध्ये काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. सोमवारी रात्री सुमारे १२.३० वाजता साहिल हा शुभम कॉलनीजवळ नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी जात असताना काही जणांशी त्याचा वाद झाला. त्यानंतर त्याला लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
साहिलच्या मदतीसाठी त्याचे वडील आणि भाऊ घटनास्थळी पोहोचले. यावेळी वाद आणखी चिघळला. आरोपानुसार, नागेश गायचंद याला त्याच्या आईने घरातून चाकू आणून दिला. त्यानंतर झालेल्या चाकूहल्ल्यात बाबासाहेब आणि निहाल गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. साहिल आणि कुणाल यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पळून जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणातील पाच संशयित हरियाणातील मूळ गावी जाण्याच्या तयारीत असताना रेल्वे स्थानक परिसरातून पोलिसांच्या हाती लागले. राजेंद्र गायचंद, शानो, मानसी, मनोज आणि नागेश अशी त्यांची नावे आहेत.
या प्रकरणातील पाचही संशयितांना न्यायालयात हजर केले असता, २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दुहेरी हत्याकांडामागील नेमकी कारणे आणि घटनेतील प्रत्येकाची भूमिका याचा तपास पोलिस करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*