छत्रपती संभाजीनगर : आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या कागदपत्रांचा वापर ऑनलाइन फसवणुकीसाठी केला जात असल्याचा गंभीर प्रकार शहरात उघडकीस आला आहे. राजस्थान पासिंगच्या संशयास्पद वाहनाचा माग काढताना छावणी पोलिसांना या रॅकेटचा सुगावा लागला. पडेगाव परिसरात केलेल्या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांनी 12 लाख 42 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई 13 ऑक्टोबर रोजी पहाटे 1.10 वाजण्याच्या सुमारास सूर्यतेज रेसिडेन्सी परिसरात करण्यात आली. छावणी पोलिसांच्या विशेष पथकाला राजस्थान क्रमांकाच्या आरजे 23 सीजी 4464 या वाहनाबाबत संशयास्पद माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी वाहनाचा शोध घेत पाठलाग सुरू केला. काही तासांच्या हालचालींनंतर हे वाहन पडेगाव येथे आढळले. वाहनाजवळ असलेल्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
पेमेंट साउंड बॉक्स आणि क्यूआर कोडचा साठा
संशयितांची चौकशी केल्यानंतर पडेगाव येथील सूर्यतेज रेसिडेन्सीमधील फ्लॅटची झडती घेण्यात आली. या ठिकाणी ऑनलाइन पेमेंटसाठी वापरले जाणारे 31 साउंड बॉक्स, 23 मर्चंट अकाउंट व क्यूआर कोड, तसेच विविध कोड स्टँड आणि स्टिकर्स आढळून आले. या साहित्याचा वापर नेमका कशासाठी केला जात होता, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
आर्थिक आमिष दाखवून कागदपत्रे मिळवल्याचा संशय
या प्रकरणातील आरोपी शहर आणि छावणी परिसरातील गरीब व गरजू नागरिकांना पैशांचे प्रलोभन देऊन त्यांची ओळखपत्रे आणि अन्य आवश्यक कागदपत्रे मिळवत असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. या कागदपत्रांच्या आधारे बँक खाती, मर्चंट खाती आणि सिमकार्ड काढून त्यांचा ऑनलाइन आर्थिक व्यवहारांसाठी गैरवापर केला जात असल्याचा आरोप आहे. अशा खात्यांमधून फसवणुकीची रक्कम वळवली जात होती का, याचाही तपास सुरू आहे.
या प्रकरणी गौरव चंद मोहनलाल, विवेक गुरुद्याल मुलोदिया, उद्देश्य प्रेमसिंग बैनाडे, महेश शिवाजी घारे आणि शहबाज अफरोज सिद्दीकी या पाच जणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या रॅकेटचे आर्थिक व्यवहार आणि इतर संभाव्य सहभागींची माहिती मिळवण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*