छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर दिसणाऱ्या एका व्हिडिओवर विश्वास ठेवणे शेंद्रा एमआयडीसीतील प्रॉडक्शन ऑफिसरला चांगलेच महागात पडले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावाचा आणि चेहऱ्याचा वापर करून तयार करण्यात आलेल्या कथित बनावट व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवण्यात आले. या जाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्याला तब्बल १७ लाख ३४ हजार ७१६ रुपयांचा आर्थिक फटका बसला. गुंतवणुकीसाठी त्यांनी घरातील सोन्याचे दागिनेही विकल्याची माहिती समोर आली आहे.

फेसबुकवरील जाहिरातीपासून फसवणुकीला सुरुवात

२८ जून रोजी संबंधित अधिकाऱ्याने फेसबुकवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा व्हिडिओ पाहिला. फॉरेक्स ट्रेडिंगमधून सर्वसामान्य नागरिकांनाही चांगला परतावा मिळू शकतो, असा दावा या व्हिडिओत करण्यात आला होता. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी सेवेक्सा लिंकवर नोंदणी केली. त्यानंतर +४४ या परदेशी क्रमांकावरून किनजा सय्यद आणि मोहम्मद यासीन वोहरा यांनी अकाउंट मॅनेजर असल्याचे सांगत त्यांच्याशी संपर्क साधला.

स्क्रीनवर नफा दिसला; प्रत्यक्षात पैसे गायब

गुंतवणुकीचा विश्वास बसावा यासाठी संबंधित अॅपच्या डॅशबोर्डवर ३२ हजार डॉलर म्हणजेच सुमारे २६ लाख रुपयांचा नफा दाखवण्यात आला. मात्र, हा नफा मिळवण्यासाठी आणखी पैसे जमा करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱ्याने या आमिषाला बळी पडून स्वतःची बचत आणि घरातील दागिने विकून पैसे जमा केले.

१४ जुलैला दिल्लीतील अहमद इंटरप्रायजेसला ७ लाख रुपये, २२ ऑगस्टला चेन्नईत २.५५ लाख रुपये, १ सप्टेंबरला अँग्री प्राइम ट्रेडर्सला ३.७१ लाख रुपये आणि ९ सप्टेंबरला पश्चिम बंगालमध्ये ३ लाख रुपये पाठवण्यात आले. २२ सप्टेंबरला अॅपवरील रक्कम आणि पोर्टफोलिओ गायब झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हर्सूल पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर सेलच्या मदतीने संबंधित व्यवहारांची माहिती गोळा केली जात असून, विविध राज्यांतील बँक खाती गोठवण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्यक्तींचे व्हिडिओ पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेऊ नये. व्हिडिओतील आवाज, ओठांच्या हालचाली आणि चेहऱ्यावरील हावभाव संशयास्पद वाटल्यास त्याची सत्यता तपासावी. गुंतवणुकीपूर्वी संबंधित प्लॅटफॉर्मची अधिकृत नोंदणी पडताळावी आणि अनोळखी व्यक्तींनी सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवणे टाळावे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

356 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क