बिडकीन येथील पत्रा विक्रेता व्यापाऱ्याला अल्ट्राटेक आणि बिर्ला सिमेंट कंपनीची डीलरशिप देण्याच्या नावाने तब्बल ८ लाख ६६ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने व्यापारी आणि त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत.
व्यापारी शेख अहेमद उस्मान, ममता पत्रा उद्योग नावाने दुकान चालवतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी निलजगाव रोडवरील पेट्रोल पंप शेजारी नवीन दुकानाचे उद्घाटन केले होते. त्यांना अल्ट्राटेक आणि बिर्ला सिमेंट कंपनीची एजन्सी घेण्याची इच्छा असल्याने त्यांनी ९ सप्टेंबर रोजी गुगलवर शोध घेतला. त्यांना गुगल क्रोमवर बिर्ला सिमेंट कंपनीचा मोबाईल क्रमांक (८८२०१८३४०३) मिळाला. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यावर समोरील व्यक्तीने आपले नाव आसीफ अन्सारी सांगत डीलरशिपसाठी ६०० सिमेंट बॅगचे १ लाख ६५ हजार रुपये डिपॉझीट करण्याचे सांगितले.
शेख अहेमद यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावरून बिडकीनमधील सेंट्रल बँकेमधून १ लाख ६६ हजार रुपये आरटीजीएसद्वारे भामट्याच्या खात्यावर ट्रान्सफर केले. ९ ते १४ सप्टेंबर दरम्यान, वेगवेगळ्या कारणांमुळे व्यापाऱ्याकडून एकूण ८.६६ लाख रुपये भामट्यांनी ऑनलाइन घेतले.
डीलरशिप आणि सिमेंटसंदर्भात वारंवार विचारणा केल्यावर भामट्यांनी मोबाईल क्रमांक बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेख अहेमद यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामीण सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर सेलचे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*