babra-temple-silver-treasure
फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावातील श्री बालाजी मंदिर परिसरात भक्तनिवास उभारण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामात ५ किलो ६०० ग्रॅम चांदीचे पुरातन दागिने सापडल्याने गावात खळबळ उडाली. महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तातडीने पंचनामा केला आणि सर्व दागिने ताब्यात घेतले.
५०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेले तीर्थक्षेत्र
बाबरा गावातील हे श्री बालाजी मंदिर ५०० वर्षे जुने असून ते एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. तिरुपती बालाजी – सावकार, तिरुपती बालाजी – देऊळगाव राजा आणि तिरुपती बालाजी – बाबरा जहागिरदार अशी मंदिराची ओळख आहे. मंदिरासाठी भक्तनिवासाची उभारणी सुरू असताना हे चांदीचे दागिने सापडले.
रविवारी (१६ फेब्रुवारी) निखिल महाले यांनी त्यांच्या आजोबांची १२४.७ चौरस मीटर जागा मंदिर ट्रस्टला दान केली. या जागेवर भक्तनिवास बांधण्यासाठी सोमवारी खोदकाम सुरू असताना मजुरांना चांदीचे दागिने सापडल्याने परिसरात उत्सुकतेची लाट पसरली.
खोदकामात दागिने सापडताच गावात खळबळ
खोदकाम करत असताना तीन ते चार फूटांवर डंडवळे, कडुळे, गळ्यातील हस आणि चांदीच्या साखळ्या सापडल्या. ही माहिती गावभर वाऱ्यासारखी पसरल्याने अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. तातडीने वडोदबाजार पोलिस ठाणे, तहसीलदार कृष्णा कानगुले आणि पुरातत्व विभागाला कळवण्यात आले.
पोलिसांनी बंदोबस्त वाढवून रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून दागिन्यांची मोजणी केली. सापडलेले सर्व दागिने शुद्ध चांदीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंदिरासाठी ही चांदी द्यावी – भाविकांची मागणी
सापडलेले सर्व दागिने तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आले असून, मंदिर ट्रस्टने हे दागिने मंदिराच्या बांधकामासाठी मिळावेत, अशी मागणी केली आहे. गावातील भाविकांनी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दागिन्यांची पंचांसमक्ष मोजणी आणि हस्तगत प्रक्रिया
५ किलो ६०० ग्रॅम वजनाचे हे चांदीचे दागिने पंचांसमक्ष मोजण्यात आले आणि महसूल प्रशासनाने त्यावर ताबा मिळवला. तहसीलदार कानगुले यांनी सांगितले की, ही चांदी सिलबंद करून कोषागारात जमा केली जाईल आणि पुढील कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार केली जाईल.
हे चांदीचे गुप्तधन मंदिरासाठी मिळणार की सरकारच्या ताब्यात राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*