Gangapur Child Marriage Case: 158 Booked, Minor Rescued
गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मामा, मामी, नवरा मुलगा, सासू-सासरे, मंडप व्यवस्थापक, आचारी, भटजी आणि उपस्थित वऱ्हाडी मंडळी अशा एकूण १५८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल चराटे यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला.
पहिल्या रात्रीच नवरीला चक्कर
मुलीच्या आईचे निधन झाले असून, तिचे पालनपोषण मामाने केले. मात्र, ती १५ वर्षे ६ महिन्यांची असताना १३ नोव्हेंबर २०२४ रोजी पैठण तालुक्यातील बालानगरच्या २३ वर्षीय युवकासोबत तिचा विवाह लावण्यात आला. विवाहानंतर नववधू सासरी गेली, परंतु पहिल्याच रात्री पतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तिला सहन न झाल्यामुळे चक्कर येऊन ती खाली पडली.
कुटुंबाचा भानामतीचा संशय; मांत्रिकाकडे उपचार
या घटनेनंतर कुटुंबाने भानामतीचा संशय व्यक्त करत बीड जिल्ह्यातील मढी येथे एका मांत्रिकाकडे मुलीचे दीड ते दोन महिने उपचार करून घेतले. दरम्यान, महिला सुरक्षा संघटनेच्या जयश्री घावटे-ठुबे यांनी चाइल्ड हेल्पलाइनवर तक्रार दाखल केली.
छापा टाकून मुलीची सुटका
महिला व बाल विकास विभागाच्या रेशमा चिमद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १६ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पैठण पोलिसांच्या मदतीने बालानगर येथे छापा टाकून मुलीची सुटका केली. या मोहिमेत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महादेव डोंगरे, सुप्रिया इंगळे, दीपक बजारे, आम्रपाली बोर्डे, यशवंत इंगोले आणि राहुल चराटे यांनी सहभाग घेतला.
बालिकेची काळजी घेतली जाईल – महिला व बाल विकास विभाग
सदरील बालिकेला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार विद्यादीप बालगृहात ठेवण्यात आले आहे. महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा चिमद्रे यांनी सांगितले की, अनाथ किंवा पालक असक्षम असल्यास महिला व बाल विकास विभागाकडे संपर्क साधावा, जेणेकरून अशा बालिकांचे संरक्षण व संगोपन योग्य प्रकारे होऊ शकेल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*