Illegal Banner Crackdown in Chhatrapati Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर : शहरातील अनधिकृत बॅनरबाजी आणि पोस्टरबाजीमुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत असल्याने महापालिकेने आता यावर कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून ही मोहीम राबवली जाणार असून, सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत बॅनर लावणाऱ्या व्यक्तींवर कडक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. विद्रुपीकरणाच्या ५२ प्रकारांत दंडाची रक्कम ५०० रुपयांपासून तब्बल २५,००० रुपयांपर्यंत असेल.
छत्रपती संभाजीनगर ही पर्यटनाची राजधानी असून, दररोज देश-विदेशातील अनेक पर्यटक येथे भेट देतात. त्यामुळे शहर स्वच्छ आणि आकर्षक राहावे, यासाठी महापालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र, काही स्थानिक भाऊ-दादांकडून शहराच्या विविध चौकांमध्ये, मुख्य रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत पोस्टर्स, फलक आणि बॅनर्स लावले जात आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे.
याला आळा घालण्यासाठी उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कठोर मोहीम हाती घेण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६, महाराष्ट्र महापालिका अधिनियम, तसेच सार्वजनिक संपत्ती हानी अधिनियम आणि मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे.
पालिकेच्या विविध विभागांकडून शहरातील अवैध बॅनरबाजीवर नजर ठेवली जात असून, नागरिकांनाही स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील सौंदर्य कायम राखण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांना आता दंडाच्या रुपाने मोठा फटका बसणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*