छत्रपती संभाजीनगर : गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून यंदा हा सण अत्यंत शुभ मुहूर्तावर साजरा केला जात आहे. सूर्योदयापासून दुपारी १२ वाजून २९ मिनिटांपर्यंत गुढी उभारण्याचा उत्तम कालावधी आहे. ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितल्यानुसार, यावर्षी रवी, बुध, शुक्र, शनी आणि राहू या पाच ग्रहांच्या संयोगाने गजकेसरी योग आणि अमृतसिद्धी योग जुळून आला आहे. त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जात आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी शालिवाहन शकाचा प्रारंभ होतो. हिंदू धर्मग्रंथांनुसार, या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणना सुरू केली होती. या दिवशी विशिष्ट आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. मिरे, हिंग, मीठ, ओवा, साखर, आणि कडुनिंबाच्या कोवळ्या फुलांचे चूर्ण चिंचेच्या पाण्यात मिसळून सेवन करावे. यामुळे आरोग्यवृद्धी, आयुष्यवृद्धी तसेच सौभाग्याची वाढ होते, असे पुराणांमध्ये सांगितले आहे.
गुढी उभारण्यामागे वैज्ञानिक कारणेही आहेत. बांबू हा आतून पोकळ असल्यामुळे तो सजीव ऊर्जेचा वाहक असतो. तसेच, गुढीवरील कलश हा चांदी, तांबे किंवा पितळ यासारख्या धातूंमध्ये तयार केलेला असतो. हे धातू वैश्विक सकारात्मक ऊर्जा आकर्षित करून परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. याशिवाय, गुढीला लिंबाची पाने लावली जातात. ही पाने वातावरणातील बॅक्टेरियल काउंट कमी करण्यास मदत करतात व नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतात.
या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताचा लाभ घेऊन प्रत्येकाने गुढी उभारावी आणि या मंगलदिनी सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या जीवनात घडवावा.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*