छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात एसटी बससेवेचा मोठा तुटवडा जाणवत असून, गंगापूर, कन्नड आणि वैजापूर या तीन प्रमुख एसटी आगारांमध्ये बसांची संख्या अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संदीपान भुमरे यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे आगारांना ४५ नवीन एसटी बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
प्रत्येक आगाराला १५ अशा एकूण ४५ नव्या बसेस मिळाल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल, असे भुमरे यांनी म्हटले आहे. एसटी महामंडळाने अलीकडेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विविध सवलती आणि सुविधा लागू केल्या आहेत. त्यामुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र, बसांची उपलब्धता अपुरी असल्यामुळे अनेक प्रवाशांना उभ्या राहून, कोंबून प्रवास करावा लागत आहे. काही वेळा तर बसच उपलब्ध नसल्यामुळे प्रवास रद्द करण्याची वेळ येते.
गंगापूर, कन्नड आणि वैजापूर या तीन तालुक्यांमधून रोज शेकडो नागरिक कामानिमित्त शहरात ये-जा करत असतात. विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. अशावेळी बससेवेची नियमितता आणि सुविधा महत्त्वाची ठरते.
“ग्रामीण भागातील प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि एसटी सेवेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी या तीन आगारांना लवकरात लवकर प्रत्येकी १५ नवीन बस उपलब्ध करून द्याव्यात,” असे ठाम मत खासदार भुमरे यांनी निवेदनात मांडले आहे.
परिवहन विभाग या मागणीवर कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*