छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपीटीने शेतकऱ्यांच्या पदरी मोठ्या नुकसानीचा डोंगर कोसळला आहे. फुलंब्री, कन्नड, वैजापूर, खुलताबाद आणि सिल्लोड तालुक्यांत जोरदार पाऊस झाला असून काही भागात गारपीटही झाली. विशेषतः फळबागा, फुलशेती, भाजीपाला, कांदा बीज आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीज पडून जनावरांचा मृत्यूही झाला आहे.
फुलंब्रीत वादळी वाऱ्यासह गारपीट
फुलंब्री तालुक्यात पिरबावडा, वहीदबाजार, बाबरा, आळंद, किनगाव, गणोरी, बिल्डा या गावांमध्ये दुपारी ३.२० वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही भागांत गारपीटही झाली. शेतकऱ्यांनी सोंगणी करून ठेवलेला गहू आणि कांदा पाऊस व गारांपासून वाचवण्यासाठी तातडीने ताडपत्रीने झाकण्याचा प्रयत्न केला. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे. याबाबत शुक्रवारी कृषी सहायकांकडून पाहणी करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी सांगितले.
सिल्लोड तालुक्यात गारांचा मारा व जनावरे मृत
सिल्लोड तालुक्यात दुपारी ४ वाजता वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडला. धोत्रा येथे दोन मिनिटांपर्यंत गारपीट झाली. निल्लोड येथे वीज पडून शेतकरी विलास पंडित मगर यांच्या गायीचा मृत्यू झाला. अजिंठा, भवन, गोळेगाव, शिवना, उंडणगाव, अभई, निल्लोड परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गारांमुळे काही ठिकाणी भाजीपाला व फळझाडांचेही नुकसान झाले आहे.
परसोडा, करंजगाव व लखमापूर परिसरात गारा वर्षाव
परसोडा परिसरातील करंजगाव, लखमापूर आणि धोंदलगाय या गावांमध्ये सायंकाळी ५ वाजता सुमारे अर्धा तास गारपीट झाली. कांदा, गहू, हरभरा यांसारखी काढणीस आलेली पिके गारांमुळे सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची मेहनत वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहरातही अवकाळी पाऊस, वेधशाळांची नोंद
छत्रपती संभाजीनगर शहरातही गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. एमजीएम हवामान वेधशाळेने २.३ मिमी, गांधेली वेधशाळेने ६.६ मिमी आणि पडेगाव पर्जन्यमापक यंत्रात तब्बल १६.६ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांच्या माहितीनुसार, शहरात वाऱ्याचा वेग १६.१ किमी प्रति तास, गांधेली परिसरात ४५.३ किमी आणि पडेगाव परिसरात ५४.७ किमी प्रति तास इतका होता.
शासनाकडे मदतीची अपेक्षा
या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून लवकरच नुकसानग्रस्त भागांची पाहणी होणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*
