छत्रपती संभाजीनगर : पिंप्री राजा ग्रामपंचायतीत कन्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक मुलीच्या जन्माचे स्वागत करा आणि बालविवाहाला विरोध करा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामस्थांना केले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने मराठी नववर्षाच्या औचित्याने हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. मुलींच्या जन्मदराचे संतुलन राखण्यासाठी आणि बालविवाह रोखण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
पिंप्री राजा ग्रामपंचायत आवारात झालेल्या मुख्य कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सरपंच वैशाली पवार, उपसरपंच मोहसीन सय्यद, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, गटविकास अधिकारी मीना रावताळे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सावरगावकर, तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती भंडारे उपस्थित होते.
मुलींच्या जन्मदराच्या घटत्या प्रमाणावर चिंता व्यक्त करत डॉ. विशाल बेंद्रे यांनी पीसीपीएनडीटी कायद्याविषयी (गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा) माहिती दिली. जिल्हाधिकारी स्वामी यांनी मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचे, त्यांच्या शिक्षण व संगोपनासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले, “बालविवाह रोखण्यासाठी आणि गर्भलिंग निदानास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. केवळ संपत्तीच्या मागे न लागता पर्यावरण संरक्षण, जल व मृद संवर्धन, आणि स्वच्छता यासारख्या गोष्टींवरही भर द्या.”
कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी बालविवाह आणि गर्भलिंग निदानास विरोध करण्याची शपथ घेतली. ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाचे गटविकास अधिकारी मीना रावताळे यांनी आभार मानून समारोप केला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*