छत्रपती संभाजीनगर : शहरात गेले काही दिवस ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे तापमानात काहीसा दिलासा मिळत होता. मात्र, शनिवारपासून उन्हाचा तडाखा पुन्हा जाणवू लागला असून रविवारी (६ एप्रिल) तापमानाचा पारा तब्बल ४०.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला. ही या उन्हाळ्यातील आतापर्यंतची सर्वाधिक नोंद झालेली उष्णता आहे.
शनिवारी (५ एप्रिल) शहराचे कमाल तापमान ३९.४ अंश सेल्सिअस होते, तर किमान तापमान २२.८ अंश नोंदवले गेले होते. एका दिवसात कमाल तापमानात २.६ अंशांनी, तर किमान तापमानात २.८ अंशांनी वाढ झाली आहे. रविवारी तापमान अधिकच वाढून कमाल ४०.२ अंश, तर किमान २३.२ अंश इतके नोंदवले गेले. हे वाढते तापमान नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि दैनंदिन कामकाजासाठीही त्रासदायक ठरत आहे.
उष्णतेपासून वाचण्यासाठी नागरिकांनी घ्याव्यात या काळज्या:
1. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत घराबाहेर जाणे टाळावे.
2. पर्याप्त पाणी प्यावे आणि शरीर हायड्रेटेड ठेवावे.
3. लिंबूपाणी, ताक, नारळपाणी, फळांचे रस अशा नैसर्गिक पेयांचे सेवन करावे.
4. डोक्यावर टोपी, डोळ्यांना गॉगल आणि अंगावर हलके, सूती कपडे घालावेत.
5. उन्हात थेट जाऊ नये; शक्यतो सावलीतून चालावे.
6. मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.
7. फळे, सत्तू, फळांचे रस, काकडी, कलिंगड यांचा आहारात समावेश करावा.
हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहणे आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*