छत्रपती संभाजीनगर : राज्य शालेय शिक्षण विभागातर्फे राबवली जाणारी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मागील चार दिवसांत ५२ हजार ४५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ४४ हजार ४९० विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासह शुल्क भरून आपली नोंदणी पूर्ण केली आहे.

शालेय शिक्षण विभागाने २६ मेपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून, येत्या ३ जून २०२५ पर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील पाचही जिल्ह्यांत ही प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे.

प्रत्येक शाळा बनणार ‘विद्यार्थी सहायता केंद्र’

या वर्षीपासून अकरावी प्रवेशासाठी केवळ ऑनलाइन प्रणालीच राबवण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना ‘विद्यार्थी सहायता केंद्र’ म्हणून काम करण्याचे निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिले आहेत.

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशानुसार राज्यभरात एकसंध ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात २४ मार्गदर्शन झोन तयार करण्यात आले असून, प्रत्येक झोनअंतर्गत शाळांनी विद्यार्थ्यांची नोंदणी, पडताळणी, अर्ज भरणे, तांत्रिक अडचणी सोडवणे यासाठी विशेष जबाबदारी घ्यायची आहे.

शिक्षण विभागाच्या महत्त्वाच्या सूचना:

👉सर्व शाळांनी ‘विद्यार्थी सहायता केंद्र’ स्थापन करून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी योग्य मार्गदर्शन द्यावे.

👉अर्ज भरताना तांत्रिक व प्रशासकीय मदत उपलब्ध करून द्यावी.

👉दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज संबंधित शाळेतूनच भरले जावेत याची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांची राहील.

👉राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळांतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रांमार्फत विशेष सुविधा पुरवण्यात याव्यात.

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीचे वेळापत्रक शिक्षण संचालक कार्यालयाने जाहीर केले असून, त्यानुसार सर्व शाळांनी नियोजनपूर्वक काम करावे, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

556 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क