छत्रपती संभाजीनगर : महामार्ग शहराच्या बाहेरून गेले असल्याने अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यात अडथळे निर्माण होतात. या स्थितीवर उपाय म्हणून टोल, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट व महामार्ग देखभाल कर्मचाऱ्यांना ‘बेसिक लाईफ सपोर्ट स्कील’चे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे अपघातानंतर तातडीची मदत मिळून मृत्यूदर कमी होईल, अशी माहिती असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी दिली. या उपक्रमाचा पायलट प्रोजेक्ट समृद्धी महामार्गावर राबविण्यात येणार आहे.
८ ते १५ जूनदरम्यान देशभरात ‘सर्जन्स वीक’ साजरा केला जात आहे. त्यानिमित्त सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सूर्यवंशी बोलत होते. यावेळी ‘एमजीएम’चे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोरा, सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सत्यजित पाथ्रीकर, सचिव डॉ. मंगेश तांदळे, डॉ. नवीन कासलीवाल व डॉ. स्वरूप बोराडे उपस्थित होते.
सप्ताहात मोफत तपासणी, शस्त्रक्रिया, व्याख्याने घेण्यात येणार आहेत. १३ जूनला सर्जन्सकडून मोफत ओपीडी सेवा देण्यात येणार आहे, तर १४ जून रोजी १० हजार सर्जन्स देशभरात रक्तदान करणार आहेत.
या सप्ताहाचा समारोप १५ जूनला छत्रपती संभाजीनगरात होणार असून देशभरातील नामवंत सर्जन्स या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ट्रामा सेंटरसाठी ‘इसेन्शियल ट्रामा लाईफ केअर सपोर्ट’ कोर्स व सर्जन्ससाठी विशेष अॅपचे उद्घाटनही होणार आहे.
डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले की, २००० मध्ये अपघातग्रस्त मृत्यूदर २० टक्के होता, जो २०२० मध्ये ३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे वेळीच मदत मिळाली तर अनेकांचे प्राण वाचवता येऊ शकतात.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*