मागील आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा परिसरातील जायकवाडी धरणात तब्बल 5 टक्क्यांची पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गोदावरी नदीतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सध्या जायकवाडी धरणात 8 हजार 327 क्यूसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे, ज्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.
सध्या जायकवाडी धरणात केवळ 10 टक्के पाणीसाठी उपलब्ध आहे, परंतु यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, आणि परभणी या शहरांना पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे या वर्षी धरणातील पाणीसाठा कमी होता. परंतु, जुलै महिन्यात धरणसाखळी क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे सध्याच्या स्थितीत पाणीसाठ्यात सुधारणा झाली आहे.
जायकवाडी धरणाच्या पाण्याच्या आवकेमुळे मराठवाड्याच्या जालना, बीड, आणि संभाजीनगर जिल्ह्यातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता शेतकरी आणि नागरिकांना आशा आहे की, पावसाळ्याच्या पुढील काळात चांगला पाऊस होऊन जायकवाडी धरणातील पाणीसाठा आणखी वाढेल, ज्यामुळे पाणीपुरवठा नियमित आणि पर्याप्त राहील.