छत्रपती संभाजीनगर : यंदा ६ जुलै रोजी साजरी होणारी आषाढी एकादशी मोठ्या प्रमाणावर भक्तगणांना आकर्षित करणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वाळूज परिसरातील प्रति पंढरपूर येथे लाखो भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग, अग्निशमन दल व इतर विविध शासकीय यंत्रणांनी एकत्र येत व्यापक व सुसूत्र नियोजन केले आहे. मंगळवारी झालेल्या नियोजन बैठकीत या संपूर्ण आराखड्याची चर्चा व अंतिम रूपरेषा ठरवण्यात आली.
या नियोजनात वाहतूक नियंत्रण, सुरक्षाव्यवस्था, दर्शन व्यवस्थापन, स्वच्छता, वैद्यकीय मदत व अपंग आणि वृद्ध भाविकांसाठी विशेष सोयी यांचा समावेश करण्यात आला आहे. बैठकीसाठी सहायक पोलीस आयुक्त संजय सानप, पो.नि. रामेश्वर गाडे, पो.नि. सचिन इंगोले, स.पो.नि. मनोज शिंदे, महावितरणच्या विशाखा ननावरे, एमआयडीसीचे गणेश मुळीकर, अग्निशमन अधिकारी अनिल देशमुख, सिडकोच्या स्वाती पाटील आणि मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्यासह भाविक मंडळी उपस्थित होती.
बॅनर-होर्डिंगवर बंदी:
पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी स्पष्ट केले की, ओअॅसिस चौक ते कामगार चौक दरम्यान कोणत्याही प्रकारचे बॅनर किंवा होर्डिंग लावण्यास बंदी घालण्यात आली आहे, कारण यामुळे सीसीटीव्ही निरीक्षणात अडथळा निर्माण होऊ शकतो. अग्निशमन विभागाला ५ ते १० अग्निशमन बंब सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, १० ते १२ रुग्णवाहिका नेहमी सज्ज राहतील.
मार्ग बंद आणि पर्यायी रस्ते:
एकादशीच्या आदल्या दिवशीपासून काही प्रमुख रस्ते बंद राहणार असून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. कामगार चौक ते एएस क्लब चौक, मोरे चौक ते ओअॅसिस चौक या मार्गांवर वाहनांची पूर्णतः बंदी असेल. वाळूज बाजूकडून येणाऱ्या वाहनांसाठी एफडीसी कॉर्नरपर्यंत रस्ता खुला राहील. नगर नाका – मिटमिटा – तिसगाव मार्ग हे पर्यायी मार्ग म्हणून ठेवण्यात आले आहेत.
दर्शनासाठी विशेष व्यवस्था:
भाविकांसाठी तीन प्रकारची दर्शन रांग ठेवण्यात येणार आहे – सामान्य, दिंडी व विशेष. ओअॅसिस चौक ते मंदिरापर्यंत रांगा लावण्यात येणार असून आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळावी यासाठी विशिष्ट जागा राखीव असतील. मंदिरात नारळ, फुले व पान नेण्यास बंदी घालण्यात आली असून दर्शन प्रक्रिया अधिक गतिमान व शिस्तबद्ध करण्यासाठी स्वयंसेवक व वैद्यकीय मदतीसाठी स्टेज उभारण्यात येणार आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*