७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी नवी दिल्लीतील इंडिया गेटवर १०,००० विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले असून, यात शिऊर (ता. वैजापूर) गावाच्या महिला सरपंच किरण विजय झिंजुर्डे यांनाही सन्मानपूर्वक आमंत्रण देण्यात आले आहे.
प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभागाने राष्ट्रीय स्तरावर ग्रामपंचायतींच्या कामगिरीसाठी स्पर्धा घेतली होती. ज्या ग्रामपंचायतींनी सहा प्रमुख सरकारी योजनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली, त्यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. शिऊर गावाने ग्रामस्वच्छता, कचरा व्यवस्थापन, बालविवाह प्रतिबंध, आरओ पाणी पुरवठा, रस्ते आणि पेव्हर ब्लॉक बसविणे, तसेच ग्रामपंचायतीचे संगणकीकरण या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
ग्रामविकासामुळे शिऊरची निवड
ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत घंटागाडीद्वारे कचरा संकलन, १००% कर भरणाऱ्यांना मोफत पाणी पुरवठा, रस्ते व पेव्हर ब्लॉक, महापुरुषांची स्मारके, आणि ग्रामपंचायतीचे संगणकीकरण यामुळे शिऊरने आपले स्थान निश्चित केले. या कामगिरीचा गौरव म्हणून सरपंच किरण झिंजुर्डे यांना दिल्लीतील प्रमुख सोहळ्याला हजेरी लावण्याची संधी मिळाली आहे.
विशेष पाहुण्यांसाठी विशेष कार्यक्रम
प्रजासत्ताक दिन सोहळ्यानंतर हे विशेष पाहुणे राष्ट्रीय युद्ध स्मारक, पीएम संग्रहालय आणि दिल्लीतील इतर महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देतील. त्यांना मंत्र्यांसोबत संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे.
शिऊर गावाची ही अभूतपूर्व कामगिरी स्थानिकांसाठी प्रेरणादायक ठरत आहे, आणि या निमित्ताने महिला नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*