छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेला गती मिळाली असून, आज गुरुवारी महावीर चौक ते एपीआय कॉर्नरपर्यंत मोठी कारवाई होणार आहे. सकाळी १०.३० वाजता ही मोहीम सुरू होणार असून, सेव्हन हिलपर्यंत ४५ मीटर व त्यानंतर एपीआय कॉर्नरपर्यंत ६० मीटर रुंद रस्त्यासाठी अतिक्रमणे हटवली जातील. काल बुधवारी मनपाने कोणतीही पूर्वसूचना न देता रेल्वेस्टेशन ते महावीर चौक मार्गावरील रस्ता रुंदीकरण मोहीम राबवली. यामध्ये ११९ लहान-मोठ्या अनधिकृत मालमत्तांवर कारवाई करत जनता हॉटेलसह अनेक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या.
सकाळपासूनच मनपा व पोलिसांचा मोठा फौजफाटा रेल्वेस्टेशन चौकात दाखल झाला होता. रेल्वेस्टेशन उड्डाणपुलासमोरील रस्ता ३५ मीटर रुंद करण्याचे नियोजन असून त्यानुसार मार्किंग करून कारवाईला सुरुवात झाली. माजी नगरसेवक शेख रशीद यांच्या भावाचे जनता हॉटेल या मोहिमेतील पहिलं लक्ष्य ठरले. धार्मिकस्थळासमोरील दुकाने, आरटीओ ऑफिससमोरील अतिक्रमण, पदमपुरा येथील दुकाने आणि काही संरक्षण भिंतीदेखील हटवण्यात आल्या.
पावसाच्या रिमझिम सरी सुरू असतानाही कारवाई चालूच राहिली. मनपाच्या दोन पथकांनी पंचवटी चौकापर्यंत मोहीम राबवली. माजी महापौर गजानन बारवाल यांनी नागरिक स्वतः अतिक्रमण काढत असल्याचे प्रशासनाला सांगितले. कालच्या कारवाईमुळे रेल्वेस्टेशन परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती, मात्र दुपारपर्यंत मलबा हटवून परिसर मोकळा करण्यात आला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HxCi3XB18w2Dvq8ojRc05z?mode=ac_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*