छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढत्या पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्मार्ट पार्किंग’ नावाचे अत्याधुनिक अॅप्लिकेशन लवकरच सुरू होणार आहे. या अॅपद्वारे नागरिकांना पार्किंगची जागा अॅडव्हान्स बुकींगद्वारे मिळणार असून, वाहनधारकांना यामुळे मोठा दिलासा मिळेल.
या प्रकल्पासाठी शहरातील मोकळ्या जागा व मुख्य रस्त्यांचा अभ्यास करून एक खाजगी एजन्सी नेमण्यात येणार आहे. बुधवारी (दि. ९) स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा झाली. मनपा आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत, नगररचना उपसंचालक मनोज गर्जे, उपायुक्त अपर्णा थेटे, अभियंता फारूक खान, सीएमआयए, मसिआ संघटनांचे पदाधिकारी आणि छत्रपती संभाजीनगर फर्स्ट टीम ऑफ असोसिएशन्सचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
या अॅपद्वारे वाहनचालक घरून किंवा ऑफिसहून निघण्यापूर्वीच पार्किंग जागेची अॅडव्हान्स बुकींग करू शकतील. बाजारपेठेतील व्यापारी किंवा दुकानदार त्यांच्या दुकानासमोरील जागा दोन वर्षांसाठी भाड्याने घेऊ शकतील, जेणेकरून त्यांच्या ग्राहकांसाठी राखीव पार्किंगची सोय होईल.
विशेष म्हणजे, पार्किंग व्यवस्थापनासाठी नेमण्यात येणाऱ्या एजन्सीमार्फत केवळ महिलांना रोजगार देण्यात येणार आहे. या महिला शिस्तबद्ध पद्धतीने पार्किंगचे नियोजन व नियंत्रण करतील. सध्या हा प्रकल्प अहमदाबादमध्ये यशस्वीरित्या सुरू असून, मुंबईत त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. लवकरच छत्रपती संभाजीनगरमध्येही हा उपक्रम प्रत्यक्षात येणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HxCi3XB18w2Dvq8ojRc05z?mode=ac_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*