मुंबई : राज्यातील बेरोजगार युवकांसाठी मोठी संधी उपलब्ध करून देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत पोलिस भरतीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांत राज्यात तब्बल 38,802 पोलिस पदांची भरती पूर्ण करण्यात आली असून, आता पुढील टप्प्यात सुमारे 11,000 नवीन पोलिस पदांच्या भरतीची तयारी सुरू आहे. ही भरती प्रक्रिया ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार असून गृह विभागाने यासाठीचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
ही भरती पोलिस शिपाई, चालक शिपाई, बँड पथकातील कर्मचारी आणि राखीव पोलिस दलातील विविध पदांसाठी होणार आहे. उमेदवारांना त्यांच्या मूळ जिल्ह्यातूनच अर्ज करता येणार असून, भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रथम मैदानी चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षा मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी पार पडणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिस भरती करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. याचबरोबर, सध्या प्रलंबित असलेल्या अनुकंपा नियुक्त्या देखील मिशन मोडमध्ये 150 दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या महाभरतीमुळे राज्यातील हजारो तरुणांना शासकीय नोकरीची सुवर्णसंधी मिळणार असून, पोलिस दलाला नवचैतन्य मिळेल. अधिकृत जाहिरात आणि अर्ज प्रक्रिया पुढील काही आठवड्यांत जाहीर होणार असल्याची माहिती गृह विभागाकडून देण्यात आली आहे.
ही घोषणा होताच राज्यभरातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून, ही भरती प्रक्रिया पारदर्शक व जलद गतीने पार पडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L1Hjnh1fHKDJBUpjMQYvag?mode=ac_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*