छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि जागतिक स्तरावरील प्रगत कृषी पद्धती आत्मसात करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने परदेशातील अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सन 2025-26 या वर्षासाठी या योजनेत युरोपमधील नेदरलॅंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स तसेच इस्त्राईल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, चीन आणि कोरिया या देशांचा समावेश करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एकूण पाच शेतकऱ्यांना निवडण्यात येणार असून, त्यामध्ये एक महिला शेतकरी, एक केंद्र किंवा राज्य कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, पीक स्पर्धा विजेता शेतकरी आणि इतर तीन शेतकरी अशी विभागणी करण्यात आली आहे.
अर्जदारांसाठी पात्रतेचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत. शेतकरी हा स्वतःच्या नावावर शेती असलेला, नियमित शेती करणारा आणि उत्पन्नाचे प्रमुख साधन शेती असलेला असावा. अर्जदाराचे वय 25 ते 60 वर्षे दरम्यान असावे. शेतकऱ्यांनी उत्पादनात उल्लेखनीय कामगिरी केली असावी तसेच शेतीविषयक नव्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली असावी. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे. शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी नोकरी करणारे, तसेच डॉक्टर, वकील, सीए, अभियंते आणि कंत्राटदार यांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे.
यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून परदेश दौऱ्याचा लाभ घेतलेले शेतकरी पात्र राहणार नाहीत. निवड झालेल्या शेतकऱ्यांना दौऱ्यासाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान स्वरूपात देण्यात येईल.
इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांनी विहित अर्ज नमुना व मार्गदर्शक सूचना तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातून प्राप्त करून संपूर्ण भरलेला अर्ज येत्या आठ दिवसांत संबंधित कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FVG9etwDw0n6MyMqWmu8uz?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*