छत्रपती संभाजीनगर : श्रावण महिना शुक्रवारपासून (दि. 25 जुलै) सुरू होत असून, भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाकडून 160 जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर आणि खुलताबाद येथील भद्रामारोती दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. त्यांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे.
दरवर्षी श्रावणात, विशेषतः श्रावणी सोमवार आणि शनिवारच्या दिवशी, वेरूळ आणि भद्रामारोती येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते. यंदाही याच गर्दीचा अंदाज घेऊन, छत्रपती संभाजीनगर विभागाने श्रावणी शनिवारसाठी 88 आणि श्रावणी सोमवारसाठी 72 जादा बसेसचे नियोजन केले आहे. भाविकांना प्रवास सुलभ आणि सुरक्षित व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे.
विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी सांगितले की, “भाविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी 160 जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. गरज पडल्यास आणखी बसेसची व्यवस्था केली जाईल. एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याने प्रवासी मोठ्या प्रमाणात एसटीला प्राधान्य देतात.”
जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील श्रावणी शनिवार आणि सोमवारसाठी ठराविक मार्गांवर या बसेस धावतील. छत्रपती संभाजीनगर, सिलोड, पैठण, वैजापूर, गंगापूर आदी ठिकाणांहून या बसेस सुटणार असून, भाविकांना परतीच्या प्रवासासाठीही विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
एसटीच्या या जादा बससेवेने, श्रावणात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून, गर्दी असूनही भाविकांना वेळेवर पोहोचणे आणि परतणे सुलभ होणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FVG9etwDw0n6MyMqWmu8uz?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*