छत्रपती संभाजीनगर :  शहरातील रस्ता रुंदीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सोमवार (दि. २८) पासून सुरू होणार असून, महापालिकेकडून हर्सूल परिसरातून या टप्प्याची सुरुवात केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांत नगर रचना विभागाने सात रस्त्यांवर मार्किंग केले असून, या सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटवून रस्ते मोकळे केले जाणार आहेत.

महापालिकेने जून महिन्यापासून शहरात रस्ता रुंदीकरण मोहीम सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात बीड बायपास रोडवरील सर्व्हिस रोडसाठी अतिक्रमणे हटवून बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर मुकुंदवाडीतील खुनाच्या घटनेनंतर पोलिसांच्या मदतीने तेथील रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात केंब्रीज चौकापर्यंत जालना रोडवरील दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रोड मोकळे करण्यात आले. तसेच पैठण रोड, पडेगाव-मिटमिटा, दिल्लीगेट ते हर्सूल टी पॉइंट, हर्सूल टी पॉइंट ते सिडको बसस्थानक, रेल्वेस्टेशन ते महावीर चौक या भागांत कारवाई पार पडली. मात्र सेव्हनहिलपर्यंतची मोहीम पूर्ण केल्यानंतर अतिक्रमण विभागाने तात्पुरती मोहीम थांबवली होती.

आता महापालिकेने पुन्हा एकदा कारवाईला गती देत हर्सूलमधून तिसऱ्या टप्प्याची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हर्सूल टी पॉइंट ते समृद्धी पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता ६० मीटर रुंदीचा करण्यात येणार आहे. याशिवाय, नारेगाव रोड ३० मीटर, सेवनहिल ते सूतगिरणी चौक ३० मीटर, सूतगिरणी चौक ते शहानूरमिया दर्गा चौक २४ मीटर, भाजीवाली बाई चौक ते आनंद गाडे चौक २४ मीटर, महावीर चौक ते मिल कॉर्नर ३५ मीटर आणि कॅन्सर हॉस्पिटल ते दिल्लीगेट ३५ मीटर रुंदीचे रस्ते टप्प्याटप्प्याने मोकळे करण्यात येतील.

महापालिकेने मार्किंग केलेल्या रस्त्यांवरील मालमत्ताधारकांनी स्वेच्छेने बाधित भाग काढण्यास सुरुवात केली आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेमुळे शहरातील प्रमुख रस्ते अधिक मोकळे आणि सुकर होणार आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FVG9etwDw0n6MyMqWmu8uz?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,365 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क