छत्रपती संभाजीनगर : वेरुळ लेणी परिसरात रविवारी दुपारी उस्मानपुरा येथील २२ वर्षीय तरुणाचा जोगेश्वरी जलकुंडात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. पर्यटन हंगामात पर्यटकांनी फुललेल्या वेरुळ लेणी परिसरात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाची ओळख हर्षदीप नाथ तांगडे (वय २२, रा. उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर) अशी झाली आहे. हर्षदीप रविवारी आपल्या मित्रांसोबत वेरुळ लेणी परिसर फिरण्यासाठी आला होता. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास लेणीच्या माथ्यावर असलेल्या जोगेश्वरी जलकुंडात पोहण्यासाठी तो उतरला. मात्र पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो बुडाला. सोबतचे मित्रांनी आरडाओरड करत मदत मागितली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी शोधमोहीम राबवून हर्षदीपचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वेरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवला आहे. सोमवारी सकाळी शवविच्छेदन होणार असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सांगण्यात आले.
दरम्यान, वेरुळ लेणी परिसरातील धबधबे व जलकुंड पावसाळ्यात तुडुंब भरून वाहत असल्याने अनेक पर्यटक येथे आकर्षित होतात. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दरवर्षी अशा घटना घडतात. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सावधानतेचा इशारा देत जलकुंड आणि धबधब्याजवळ पोहणे किंवा साहसी कृत्ये टाळावीत, असे आवाहन केले आहे.
या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, हर्षदीपच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबीय आणि मित्रपरिवार हळहळ व्यक्त करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*