छत्रपती संभाजीनगर : ‘शिक्षण वाचवा – विद्यार्थी वाचवा’ या घोषणांनी सोमवारी शहरातील वातावरण दुमदुमून गेले. भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने आयोजित राज्यव्यापी विद्यार्थी महारॅलीत हजारो विद्यार्थी, पालक, स्पर्धा परीक्षार्थी आणि शिक्षणप्रेमी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भर पावसातही ही रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली.
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीचे नेतृत्व भारतीय विद्यार्थी मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी सिद्धांत मौर्य यांनी केले. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमधील विद्यार्थी प्रतिनिधी आणि बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांनी रॅलीत हजेरी लावली.
या आंदोलनात शिक्षणाचे खाजगीकरण थांबवणे, शिक्षणाचे बाजारीकरण रोखणे, ग्रामीण भागातील बंद पडणाऱ्या शाळा वाचवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना, कॉन्ट्रॅक्टऐवजी कायमस्वरूपी शिक्षकांची भरती आणि राज्यातील हजारो रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली. तसेच, वसतिगृहांची दुरवस्था थांबवून विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि शिष्यवृत्ती वेळेवर वितरित करण्याचीही मागणी करण्यात आली.
रॅलीच्या अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शासनाने शिक्षण क्षेत्रातील वाढत्या समस्या गांभीर्याने हाताळून तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा राज्यभर मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा आयोजकांनी दिला.
भारतीय विद्यार्थी मोर्चाचे म्हणणे आहे की विद्यार्थी हेच देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या समस्या वेळेत सोडवल्या गेल्या नाहीत, तर शिक्षण क्षेत्रातील असंतोष सामाजिक आंदोलनाचे रूप धारण करू शकतो. आयोजकांनी स्पष्ट केले की आजची महारॅली ही केवळ सुरुवात असून, शासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारले जाईल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*