छत्रपती संभाजीनगर : शहरातील लोकप्रिय सिद्धार्थ उद्यान तब्बल ४७ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून (दि. २८) सर्वसामान्यांसाठी खुले झाले आहे. ११ जून रोजी वादळवाऱ्यासह झालेल्या पावसात प्रवेशद्वारावरील डोमलगतची पॅराफिट वॉल कोसळून दोन महिला पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर महापालिकेने उद्यान तातडीने बंद करून स्ट्रक्चरल ऑडिटसाठी आदेश दिले होते.
मनपा आयुक्त व प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार खासगी कंपनीने ऑडिट केले, मात्र हा अहवाल जवळपास महिनाभर विलंबाने सादर झाला. अखेर २३ जुलै रोजी प्रवेशद्वारावरील डोम काढून टाकण्यात आला, तसेच डोमचे पिलर व अन्य सिमेंट बांधकाम पाडण्यात आले. मुख्य प्रवेशद्वाराची कमान मात्र तशीच ठेवण्यात आली आहे. यामुळे मार्निंग वॉक, व्यायाम आणि फिरण्यासाठी उद्यानात येणाऱ्या नागरिकांना आता पुन्हा “ऑक्सिजन हब” मध्ये श्वास घेण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, उद्यानाच्या प्रवेशद्वारालगत बीओटी तत्वावर बांधलेली २२ दुकाने मात्र अद्याप बंद राहणार आहेत. महापालिकेने विकासकासोबतच्या करारानुसार या दुकानांत व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली असली, तरी संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत सुरक्षा कारणास्तव दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बीओटी करारानुसार या प्रकल्पातील ३० टक्के अधिकार महापालिकेकडे तर ७० टक्के अधिकार विकासकाकडे आहेत.
सिद्धार्थ उद्यान हे शहरातील सर्वात लोकप्रिय पर्यटक स्थळांपैकी एक असून, दररोज शेकडो नागरिक फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी येथे येतात. उद्यान दीड महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांचे दिनक्रम विस्कळीत झाले होते. आजपासून पुन्हा उद्यान खुलं झाल्याने शहरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*