छत्रपती संभाजीनगर : हर्सूल टी पॉईंट ते समृद्धी लॉनदरम्यान २०० फूट रुंदीकरणाच्या कामासाठी महापालिकेची पाडापाडी मोहीम मंगळवारपासून (दि. २९) सुरू होणार आहे. प्रत्यक्षात ही कारवाई सोमवारी (दि. २८) सुरू करण्याचे नियोजन होते; मात्र बाधित नागरिकांच्या विनंतीवरून प्रशासक जी. श्रीकांत यांनी एक दिवसाची मुदतवाढ देत मोहीम मंगळवारी राबवण्याचा निर्णय घेतला.

या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे सुमारे १५० मालमत्ताधारक बाधित होणार आहेत, यापैकी जवळपास ५० टक्के जणांना त्यांची मालमत्ता पूर्णपणे गमवावी लागणार आहे. १५ जुलै रोजी महापालिकेच्या पथकाने दोन्ही बाजूंनी ३०-३० मीटरवर मार्किंग केले होते. त्यावेळी काही नागरिक आणि मनपा अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वादही झाला होता. विशेष म्हणजे, दीड वर्षांपूर्वी जी-२० परिषदेच्या निमित्ताने विदेशी पाहुण्यांच्या अजिंठा लेणी भेटीसाठी या रस्त्याचा १०० फूट रुंदीकरणाचा टप्पा पूर्ण झाला होता. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बाधितांना मोबदला दिला होता. आता उर्वरित १०० फूट रुंदीकरणासाठी महापालिका सज्ज झाली आहे.

या मोहिमेसाठी प्रशासनाने १५ जेसीबी, १५ टिप्पर, ४ पोकलेन, तसेच २५० मनपा अधिकारी-कर्मचारी आणि मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची तयारी केली आहे, अशी माहिती अतिक्रमण संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली. प्रशासनाचे म्हणणे आहे की, हा रस्ता समृद्धी महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने वाहतुकीची सोय आणि शहर विकासासाठी हा प्रकल्प आवश्यक आहे.

दरम्यान, काही बाधितांनी नुकतीच बांधकामे केली असून, काहींनी गृहप्रवेशही केलेला नाही. त्यामुळे बाधितांना न्याय्य भरपाई मिळावी आणि कोणताही अन्याय होऊ नये, यासाठी महापालिकेने चर्चा सुरू केल्या आहेत. मंगळवारपासून सुरू होणारी ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,252 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क