छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी बाधित होणारी अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी २९ जुलैपासून हर्सूल परिसरात तिसऱ्या टप्प्यातील मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध न झाल्यामुळे ही कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली असून, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारपासून (दि.२९) होणारी ही कारवाई लांबणीवर पडली आहे.

याआधी महापालिकेने जून महिन्यात बीड बायपास रोडवरील देवळाई चौक ते महानुभाव आश्रमदरम्यान दोन्ही बाजूंच्या अतिक्रमणांवर कारवाई केली होती. त्यानंतर मुकुंदवाडी-संजयनगर, पैठण रोड, पडेगाव-मिटमिटा, जळगाव रोड, व्हीआयपी रोड आणि रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. शहरातील मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या आदेशानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही मोहीम राबविली जात आहे. महापालिकेने विकास आराखड्यातील रस्त्यांवर मार्किंग करून बाधित बांधकामे स्वखुशीने काढून टाकण्याचे आवाहन संबंधित मालमत्ताधारकांना केले होते.

हर्सूल येथील महापालिका हद्दीतील रस्त्यावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई २८ जुलैपासून सुरू होणार होती. मात्र, काही लोकप्रतिनिधींच्या विनंतीवरून एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर २८ जुलै रोजी सायंकाळी पोलिस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत या कारवाईसाठी बंदोबस्ताच्या मागणीवर चर्चा झाली.

सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सध्या एमआयडीसी भागातील अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेला हर्सूल रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईसाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आवश्यक फौजफाटा उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेची तिसऱ्या टप्प्यातील मोहीम काही दिवसांनी सुरू होणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,377 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क