छत्रपती संभाजीनगर – “अभ्यास, गुण, अपेक्षा… आणि मनावरचा वाढता ताण” – याच भावनांच्या ओझ्यातून १४ वर्षीय मुलाने घराचा निरोप घेतला. केवळ डोळ्यांत एकच स्वप्न – थेट केदारनाथ गाठायचे. मात्र, सात दिवसांचा हा प्रवास कल्याण रेल्वेस्थानकावर संपला, आणि पोलिसांच्या मदतीने आई-वडिलांच्या कुशीत परतताना कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला.
चिखली येथील उद्योजकाचा मुलगा रवी (नाव बदलले आहे) कुटुंबासह पुंडलिकनगर परिसरात राहतो. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारा रवी ३० जुलै रोजी शाळेला जाण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, शाळेची बस सुटल्याने तो घरी परतला नाही. सिडको बसस्थानक गाठून त्याने आपली अनोखी सफर सुरू केली. संध्याकाळपर्यंत शोध घेतल्यानंतर कुटुंबाने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रेशीम कोळेकर आणि सुनील म्हस्के यांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून शोधमोहीम सुरू केली.
पाचोड ते चेन्नई – पायवाट अन् रेल्वेमार्ग
सुरुवातीला रवीने पाचोड गाठले. आईला भेटण्यासाठी बीडला जात असल्याचे सांगून एका व्यक्तीकडून पैसे मिळवले. पुढे बीड, मांजरसुंबा, परळीपर्यंतचा प्रवास करत तो एका हॉटेलच्या सीसीटीव्हीत दिसला. मात्र, पोलिस पोहोचण्याआधीच तो हैद्राबादकडे रवाना झाला. हैद्राबादमध्ये काही दिवस मुक्काम करून रेल्वेने चेन्नई गाठले, आणि शेवटी पुन्हा कल्याणला परतला.
थकलेला चेहरा, डोळ्यांतून वाहणारे अश्रू…
कल्याण रेल्वेस्थानकावर थकलेल्या अवस्थेत रवीला बसलेले पाहून रेल्वे पोलिसांना संशय आला. चौकशीत त्याच्या बॅगेतील कागदपत्रांतून संपर्क क्रमांक मिळाला. पोलिसांनी तत्काळ वडिलांना संपर्क केला. शहर पोलिसांसह वडील कल्याणला पोहोचले. आईच्या डोळ्यांत अश्रू होते, तर मुलानेही आईला पाहताच तिच्या गळ्यात लटकत हुंदके दिले.
“अभ्यासाचा तणाव असह्य झाला…”
पोलिसांसमोर रवीने कबुली दिली की, अभ्यासाच्या तणावातूनच घर सोडले. “मला कुठेतरी दूर, शांत ठिकाणी जायचे होते… म्हणून केदारनाथ गाठायचे ठरवले,” असे त्याने सांगितले. निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक कोळेकर यांनी त्याला समजावत सुरक्षित घरी परत पाठवले.
ही घटना केवळ एका मुलाची नाही, तर प्रत्येक पालकासाठी धडा आहे – मुलांच्या मनातला ताण, भीती आणि अपेक्षांचा भार ओळखणे गरजेचे आहे. रवीचा प्रवास तर संपला, पण त्याची गोष्ट प्रत्येक घरात विचार करायला लावणारी ठरते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*