छत्रपती संभाजीनगर : शहरात सुरू असलेल्या बुलडोझर कारवाईविरोधात आणि पावसाळ्याच्या तोंडावर बेघर झालेल्या नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी शुक्रवारी (८ ऑगस्ट) ‘सर्वपक्षीय जन आक्रोश महामोर्चा’ काढण्यात आला. हा मोर्चा क्रांती चौक येथून दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झाला. सिल्लेखाना, पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक, किल्ले अर्क, व्हिआयपी रोड मार्गे मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर दुपारी ३ वाजता पोहोचला.
आयोजकांनी सांगितले की, “अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली प्रशासनाने कोणतेही पुनर्वसन न करता गोरगरीब, दलित, बहुजन, कामगार, अल्पसंख्याक व मागासवर्गीय नागरिकांना घराबाहेर काढले आहे. त्यामुळे शेकडो नागरिक अक्षरशः रस्त्यावर आले असून त्यांची मोठी अडचण झाली आहे. ही कारवाई अन्यायकारक असून तत्काळ थांबवावी.”
मोर्चात कोणत्याही एकट्या संघटनेचा सहभाग नसून सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, आंबेडकरवादी, संविधानवादी, समतावादी व मानवतावादी संघटना, तसेच आंबेडकरी चळवळीतील विविध गटांनी एकत्रितपणे हा मोर्चा आयोजित केला होता. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींविरुद्ध जोरदार घोषणाबाजी झाली.
या मोर्चात दिपक निकाळजे, अरविंद कांबळे, दिपक केदार, अमित वाहुळ, जयश्री शिरके, विष्णु जगताप, आनंद कस्तुरे, जयेश अभंग, मनोज जाधव, मिलिंद बनसोडे, विजय शिंगारे, वसंतराज वक्ते, बलराज दाभाडे, सिध्दोधन मोरे, नागेश केदारे, विजय बचके, सचिन जोगदंडे, संतोष चव्हाण, राजकुमार कांबळे आदींसह अनेक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
मोर्चात सहभागी झालेल्यांनी प्रशासनाने तातडीने पुनर्वसनाची सोय करावी, अतिक्रमण कारवाईदरम्यान नागरिकांना पर्यायी निवास द्यावा, तसेच पावसाळ्यात कारवाई थांबवावी, अशी मागणी केली. अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*