छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांना वाढीव आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या अमृत २ योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या महत्त्वाच्या जलपुरवठा प्रकल्पाचे आज उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी ३ वाजता या योजनेचे जलपूजन होणार आहे. या योजनेतून १९३ कोटी रुपये खर्चून ७५ एमएलडी क्षमतेची ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी आणि फारोळा येथे २६ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे.
या प्रकल्पामुळे शहराला दररोजच्या पाणीपुरवठ्यात वाढ होऊन पाण्याचे खंड कमी होणार आहेत. सध्या शहराला मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा करता यावा यासाठी राज्य शासनाने अमृत २ योजनेतून २७४० कोटी रुपयांचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. या योजनेत २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी बसविण्याचे काम सुरू असून, त्याचा पहिला टप्पा दिवाळीपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
तथापि, त्याआधी शहरवासीयांना पाण्याच्या समस्येतून तात्पुरता दिलासा देण्यासाठी या १९३ कोटींच्या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. हे काम दीड वर्षात पूर्ण झाले असले तरी जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला उशीर झाल्याने संपूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी अडीच वर्षे लागली. आता या जलवाहिनीतून शहराला पूर्ण क्षमतेने ७५ एमएलडी पाणी मिळणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री संजय शिरसाट, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय केणेकर, आमदार विलास भुमरे यांच्यासह एमजेपीचे सदस्य सचिव रंगा नायक, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, महापालिका प्रशासक जी. श्रीकांत आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित राहणार आहेत.
या प्रकल्पामुळे शहरवासीयांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*