छत्रपती संभाजीनगर : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला साजऱ्या होणाऱ्या हरतालिकेच्या व्रताला आज महिलांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी होणाऱ्या या व्रताचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप मोठे आहे. विशेषत: विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी तर अविवाहित मुली योग्य जोडीदार मिळावा या उद्देशाने हा उपवास करतात.
धार्मिक ग्रंथानुसार, हे व्रत पार्वतीमातेनं केलेल्या तपश्चर्येच्या स्मरणार्थ पाळले जाते. या दिवशी महिलांनी चौरंगावर लाल कापड टाकून वाळूपासून शिवलिंग तयार करावे. पार्वती, शंकर आणि गणपतींच्या मूर्ती ठेवून पूजन करावे. उजव्या हाताला तांदळापासून अष्टकमल तयार करून त्यावर कलश स्थापन केला जातो. कलशावर स्वस्तिक काढून त्यात पाणी, सुपारी, हळद आणि नाणे ठेवले जाते. पूजनावेळी मूर्तींना अभिषेक करून सौभाग्याच्या वस्तू, पत्री, फुले अर्पण केल्या जातात. आरती करून पंचामृत आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. या व्रतात १६ श्रृंगाराचे विशेष महत्त्व असून महिला याची मनोभावे पूजा करतात.
यंदा हरतालिकेची तृतीयेची तिथी २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३४ वाजता सुरू झाली असून २६ ऑगस्ट दुपारी १.५४ वाजता संपेल. पूजनाचा शुभ मुहूर्त आज सकाळी ५.५६ ते ८.३१ वाजेपर्यंत आहे. पारंपरिक रितीरिवाज पाळत महिला आज दिवसभर उपवास करून पार्वतीमातेची आराधना करतील. या व्रतामुळे वैवाहिक जीवनात सौख्य आणि ऐश्वर्य येते, तसेच अविवाहित मुलींना उत्तम पती मिळतो, अशी श्रद्धा आहे.
आज शहरातील मंदिरे, घराघरात पूजा आणि आराधनेचे वातावरण असून हरतालिकेच्या निमित्ताने भक्तीभावाने ओथंबलेले दृश्य पाहायला मिळत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*