खुलताबाद : मराठा आरक्षण आंदोलनाला बळकटी देण्यासाठी छत्रपती शिवरायांचे अश्वारूढ स्मारक आंतरवली सराटीकडे रवाना झाले. श्री भद्रा मारुती मंदिर परिसरात शिवभक्तांच्या उपस्थितीत नारळ फोडून व रथाचे पूजन करून या स्मारकाचा प्रवास सुरू झाला. हे स्मारक २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षण महामोर्चात सहभागी होणार असून, आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करणार आहेत.
खुलताबाद तालुका सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाच्या लढ्यात आघाडीवर आहे. आंतरवली सराटी येथील सभा, मुंबई-वाशीपर्यंतचा मोर्चा आणि राज्यभरातील संवाद सभांमध्ये छत्रपतींचा हा पुतळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या स्मारकाची उंची १२ फूट तर लांबी १५ फूट असून, प्रवास सोयीस्कर व्हावा म्हणून तो आयशर गाडीवर बसवण्यात आला आहे. गाडीवर साऊंड सिस्टिम, लाईटसाठी जनरेटर आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने छोटा स्टेज सुद्धा तयार करण्यात आला आहे.
या स्मारकाची संकल्पना राजेंद्र पवार यांची असून, शिल्पकार स्वाती नरेंद्रसिंग साळुंखे यांनी हे भव्य स्मारक घडवले आहे. रथाचे सारथ्य राजूभाऊ चव्हाण करणार असून, सूचना देण्यासाठी गणपतराव मस्के उपस्थित राहतील. साऊंड सिस्टिमची जबाबदारी अमोल काकडे पाटील यांच्याकडे आहे, तर गाडीचे रथात रूपांतर धुमाळ डीजे बॉडी बिल्डर यांनी केले आहे.
२७ ऑगस्ट रोजी गणेश स्थापना होणार असून, त्या दिवशी खुलताबाद तालुक्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजेंद्र पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने केले आहे. स्मारक रवाना करताना परिसरात जल्लोषाचे वातावरण होते आणि शेकडो मराठा बांधवांनी जयघोष करत या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात केली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*