मुंबई : मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. हायकोर्टाने जरांगे यांना आझाद मैदानावर उपोषण करण्यास मनाई केली असून, त्याऐवजी खारघर किंवा नवी मुंबई परिसरात उपोषण करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

मनोज जरांगे यांनी उद्या बुधवारी सकाळी 10 वाजता मुंबईच्या दिशेने कूच करण्याची घोषणा केली होती. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपोषणाची हाक दिल्याने राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. परिस्थिती हाताळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले ओएसडी राजेंद्र साबळे यांना आंतरवली सराटीत पाठवून जरांगे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे यांनी मुंबईला जाण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम भूमिका घेतली. या घडामोडीत हायकोर्टाने आज हस्तक्षेप करून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास नकार दिला आहे.

हायकोर्टाने दिले स्पष्ट निर्देश

हायकोर्टाने आदेश दिला की परवानगीशिवाय मुंबईतील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत. मुंबईतील वाहतूक आणि गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे उपोषणासाठी खारघर किंवा नवी मुंबईसारख्या पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा सल्ला कोर्टाने दिला आहे. मुंबई शहरातील वाहतूक विस्कळीत होऊ नये, या उद्देशाने हे निर्देश देण्यात आले आहेत.

जरांगेंची ठाम भूमिका कायम

दरम्यान, हायकोर्टाच्या आदेशानंतरही मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहणार असल्याचे स्पष्ट केले. “आझाद मैदानावर उपोषण का करता येणार नाही?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी म्हटले, “आम्ही कायदा व संविधानाचे सर्व नियम पाळून आंदोलन करू. आम्ही 100 टक्के मुंबईला जाणार. न्यायदेवता आमचे म्हणणे नक्कीच ऐकून घेईल.”

जरांगे यांनी स्पष्ट केले की कोर्टाचा आदेश मान्य ठेवला जाईल आणि त्यांच्या वकिलांमार्फत कायदेशीर मार्गाने लढा दिला जाईल. “न्यायदेवता जनतेचे गाऱ्हाणे ऐकते आणि आम्हाला नक्की न्याय मिळेल,” असेही ते म्हणाले. हायकोर्टाने पुढील आदेश देईपर्यंत परवानगीशिवाय आंदोलन न करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.

या घडामोडींनंतर राज्याचे राजकीय वातावरण तापले असून, जरांगे यांच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,243 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क