मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे राज्यातील शेतकरी, पायाभूत सुविधा आणि सुरक्षाव्यवस्था या सर्व क्षेत्रांना दिलासा मिळणार आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी तब्बल ८२२ कोटी रुपयांची कर्ज उभारणी करण्यास मान्यता मिळाल्याने शहरातील नागरिकांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे.

शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे गेल्या काही वर्षांपासून पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर झाली आहे. उन्हाळ्याच्या काळात दरवर्षी टँकरवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत हा नवा पाणीपुरवठा प्रकल्प उभारण्यासाठी मिळणारे निधी मंजुरीचे पाऊल म्हणजे शहरवासीयांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. हडकोकडून २००० कोटी रुपयांच्या कर्ज योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात हा निधी उभारण्यात येणार असून, त्यातील ८२२ कोटी रुपये थेट छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहेत.

या व्यतिरिक्त मंत्रिमंडळाने आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. ऊर्जा विभागाने उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या सवलतीमुळे राज्यातील १,७८९ योजनांचा लाभ हजारो शेतकरी सभासदांना होणार आहे. तसेच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चार मलनिस्सारण प्रकल्पांसाठी २६८ कोटी रुपये, तर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ११६ कोटी रुपये कर्ज उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी (ता. मुर्तिजापूर) येथील लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या दुरुस्तीमुळे सिंचन क्षमतेत वाढ होऊन शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. महसूल विभागाने रायगड जिल्ह्यातील आसुडगाव येथील गायरानातील चार हेक्टर जमीन इंटेलिजन्स ब्युरोसाठी अधिकाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामासाठी देण्यास मान्यता दिली आहे.

या सर्व निर्णयांमध्ये छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा प्रकल्पासाठी मिळालेली निधी मंजुरी हा शहरासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरला आहे. नागरिकांना येत्या काळात पाणीटंचाईतून मुक्तता मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रकल्पामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल आणि दीर्घकालीन स्वरूपात नागरिकांना शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

725 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क