छत्रपती संभाजीनगर : हत्या, दरोडा आणि घरफोडीसारख्या तब्बल २८ गंभीर गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात पोलिसांना मदत करणारी पोलीस श्वान ‘खुशी’ हिचे निधन झाले. डॉबरमॅन जातीच्या या प्रशिक्षित श्वानाच्या निधनामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी भावपूर्ण वातावरणात तिला अखेरचा निरोप दिला.
२० नोव्हेंबर २०१३ रोजी जन्मलेली खुशी पुण्यातील श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षित झाली होती. मार्च २०१५ मध्ये ती छत्रपती संभाजीनगर जिल्हा पोलीस दलाच्या बॉम्बशोधक पथकात दाखल झाली. बॉम्ब शोधण्याबरोबरच, गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींचा माग काढणे, पुरावे गोळा करणे आणि तपासाला दिशा देणे यात ती पारंगत होती. तिच्या या कौशल्यामुळे गेल्या दहा वर्षांत अनेक गुन्हे उघडकीस येण्यात पोलिसांना मोठी मदत झाली. पोलिस दलातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी तिला अनेक वेळा सन्मानित करण्यात आले होते.
खुशीने सेवाकाळात तब्बल दहा वर्षे अखंड निष्ठा, शौर्य आणि सेवा दाखवली. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच तिने अखेरचा श्वास घेतल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या निधनानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग आणि उपविभागीय अधिकारी गौतम पातारे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
खुशीची काळजी घेतलेल्या हँडलर पी.आर. मिसार आणि व्ही.एस. तळेकर यांच्या चेहऱ्यावर सहकाऱ्याला गमावल्याचे दुःख स्पष्ट दिसून येत होते. पोलिस दलातील प्रत्येक जण तिच्या कार्यक्षमतेबद्दल आणि निष्ठेबद्दल अभिमान व्यक्त करीत होता.
खुशी ही केवळ एक पोलीस श्वान नव्हती, तर पोलीस दलातील विश्वासू आणि समर्पित सदस्य होती. तिच्या निधनाने पोलीस दलाला मोठा तोटा झाला आहे. तिच्या सेवांचा आणि योगदानाचा सन्मान पोलीस दल कायम स्मरणात ठेवेल, असा सूर पोलिसांमध्ये व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*