छत्रपती संभाजीनगर : “जागर दशसूत्रीचा – स्वरगौरव मुक्तीसंग्रामाचा” या घोषवाक्याखाली मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील ७५ हजार हून अधिक विद्यार्थी सामूहिक गीतगायनात सहभागी होणार आहेत. हा अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम बुधवार, दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता पार पडणार असून जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा कार्यक्रम गोकुळ स्टेडियम, पोलीस मुख्यालय, ग्रामीण हडको छत्रपती संभाजीनगर येथे होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सामाजिक न्याय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट तसेच अन्य लोकप्रतिनिधी व मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा या उपक्रमात सहभाग असून, ३०,००० विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहतील तर प्रत्येक तालुक्यातून ५ हजार विद्यार्थी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या दिवशी विद्यार्थ्यांकडून सामूहिक श्रमदान, सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तिपर गीते तसेच विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांच्या बलिदानाची जाणीव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे व त्यांच्या कार्याचा गौरव करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव होईल तसेच देशभक्तीची प्रेरणा मिळेल. जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती आश्विनी लाटकर यांनीही या उपक्रमाची माहिती दिली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*