छत्रपती संभाजीनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्याने गोर-गरीब हातगाडी चालकांना भारत वीर इलेक्ट्रिक हातगाड्यांचे वितरण करण्यात आले. ही सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी मोठी गोष्ट असून, यामुळे हातगाडी चालकांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला. क्रांती चौकात गुरुवारी (दि.१७) वाय. बी. मित्र मंडळ, मुंबई यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पाच लाभार्थ्यांना प्रतीकात्मक स्वरूपात या इलेक्ट्रिक हातगाड्या वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संदीपान भुमरे , श्री क्षेत्र पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास संदीपान भुमरे , वाय. बी. फाउंडेशनचे योगेश भूतडा, युवासेना शहरप्रमुख ज्योतीराम पाटील, सचिन मुळक, रिपाईचे मराठवाडा अध्यक्ष कुंदन लाटे, किशोर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री भरत गोगावले म्हणाले की, “ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आपल्याला ७५ गावे सक्षम करण्याचा संकल्प करावा लागेल. शेतकऱ्यांच्या दारापर्यंत सरकारी योजना पोहोचवायच्या असतील, तर रोजगार हमी योजनेतून अधिकाधिक उपक्रम राबवणे गरजेचे आहे. हे खाते यापूर्वी खासदार संदीपान भुमरे यांच्याकडे होते आणि त्यांनी सुरू केलेल्या चांगल्या कामांना आम्ही पुढे नेणार आहोत.
पाच लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक हातगाड्या वाटप करण्यात आल्या. यामुळे त्यांना रोजगारात दिलासा मिळेल तसेच रोजंदारीवर अवलंबून असलेल्या कुटुंबाला आर्थिक बळकटी मिळणार आहे.
शासन व बँकांनी करावे अर्थसहाय्य :
इलेक्ट्रिक हातगाडीचा आविष्कार करणारे अभियंता आणि इलेक्ट्रिक हातगाडी निर्माता श्री सुयोग चांडक यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी या गाड्या खास गरीब व सर्वसामान्य हातगाडी चालकांच्या सोयीसाठी अविष्कार केल्या आहेत. कार्यक्रमात बोलताना त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की, “ज्या प्रकारे दुचाकी किंवा इतर वाहनांना शासन व बँका अर्थसहाय्य, कर्जसुविधा किंवा सबसिडी देतात, त्याचप्रमाणे या इलेक्ट्रिक हातगाडी चालकांनाही शासनाने मदत करावी. यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल आणि स्वावलंबन वाढेल.”
या उपक्रमामुळे हातगाडी चालवणाऱ्या गोरगरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, अशा योजनांचा विस्तार राज्यभर होण्याची अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*