छत्रपती संभाजीनगर : समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी दोन दिवसांचा फुले-शाहू-आंबेडकरी जलसा छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा जलसा १९ व २० सप्टेंबर रोजी तापडिया नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील लोककला, लोकपरंपरा आणि भक्ती परंपरेचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला सामाजिक उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नवमाध्यमातून व्हावी, या उद्देशाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याच परंपरेतून फुले-शाहू-आंबेडकरी जलसा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून आणि विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
या जलशामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार सहभागी होणार असून, त्यामध्ये ख्यातनाम शाहीर देवानंद माळी, शाहीर राजा कांबळे, शाहीर चंद्रकांत प्रल्हाद शिंदे, विजय सरतापे, तसेच ख्यातनाम गायिका रागिणी बोदडे, सरला वानखेडे, सपना खरात, चेतन कुमार चोपडे आणि रामलिंग जाधव आपल्या कलाकृतींनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. शाहिरी पोवाडे, सत्यशोधकी जलसे आणि प्रबोधनात्मक गीतांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा जागर रंगणार आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक यांनी आवाहन केले आहे की, या संगीतमय जलशामध्ये कला रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शाहिरी पोवाडे, कलापथकाचे सादरीकरण आणि जागराचा आनंद घ्यावा. दोन दिवस चालणाऱ्या या जलशामुळे शहरात सांस्कृतिक उत्साहाची लहर निर्माण होणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*